गीत : मन वढाळ वढाळ I मराठी गाणी


 

गीत : मन वढाळ वढाळ

मन वढाळ वढाळ
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरुनं येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्‍यानं चालल्या
पाण्यावरल्या रे लाटा

मन पाखरू पाखरू
याची काय सांगू मात ?
आता होतं भुईवर
गेलं गेलं आभाळात

मन जहरी जहरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, विंचू, साप बरा
त्याला उतारे मंतर !

मन एवढं एवढं
जसा खसखसचा दाना
अन्‌ मन केवढं केवढं ?
त्यात आभाळ मायेना

देवा आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तुला
असं सपनं पडलं !

 

कवियत्री : बहिणाबाई चौधरी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)