नवोपक्रमशील शिक्षिका सौ. शिल्पा वनमाळी यांना यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा शाळेतील नवोपक्रमशील शिक्षिका सौ. शिल्पा बळवंत वनमाळी यांना जिल्हा परिषद पालघर यांच्या तर्फे देण्यात येणार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 , जिल्ह्याचे पालकमंत्री मान. नामदार श्री .रवींद्र चव्हाण साहेब , जि. प. अध्यक्ष मान. श्री प्रकाश निकम साहेब, जि. प. उपाध्यक्ष/शिक्षण समिती सभापती मान श्री. पंकज कोरे साहेब यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्याचे खासदार मान श्री राजेंद्र गावित साहेब , मान आमदार श्री रवींद्र फाटक साहेब , मान आमदार श्री श्रीनिवास वनगा साहेब , जिल्हाधिकारी श्री गोविंद बोडके साहेब , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भानुदास पालवे साहेब व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सौ. शिल्पा वनमाळी या नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अध्यापन करत असतात. शालेय अध्यापनाला सण उत्सवांची जोड या त्यांच्या विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी उपस्थिती १००% राखण्यात त्या नेहमीच यशस्वी ठरत असतात.
कोविड काळातही वेगवेगळे ऑनलाइन ,ऑफलाइन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात क्रियाशील ठेवण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले होते. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतानाच माता पालक, किशोरवयीन मुली यांच्यासाठी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कार्यशाळा , विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. अनेक सामाजिक संस्था व दाते यांच्या माध्यमातून त्यांनी शाळेला भौतिक सुविधा मिळवून दिल्या आहेत .तसेच ५एप्रिल २०२३ रोजी त्यांच्या शाळेला ISO मानांकन प्राप्त झाले आहे .
त्या उत्तम कवियत्री आणि लेखिका असून त्यांचे 2 कविता संग्रह ,शिल्पकाव्य ,स्मृतिगंध आणि 1 कथासंग्रह कथाशिल्प प्रसिद्ध झाले आहेत .
त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण शैक्षणिक ,सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना आज 1 मे 2023 ,महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पालघर येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सौ शिल्पा वनमाळी यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.