पालघर जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने गौरव
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारित करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नव्या नावाने राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दरवर्षी दिला जाणारा शैक्षणिक पटलावरील प्रतिष्ठित राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार हा नव्या नावाने म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2021-22 हा पुरस्कार डहाणू तालुक्यातील माध्यमिक प्रवर्गातून के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू येथील बाळासाहेब चव्हाण, प्राथमिक विभागातून पालघर तालुक्यातील सफाळे केंद्रातील जि. प. शाळा कर्दळ येथील राजन गरुड तर प्राथमिक विभागातील आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक प्रवर्गातील जव्हार तालुक्यातील धानोशी केंद्रातील जि. प. शाळा काळीधोंड येथील भाऊसाहेब शेटे यांना शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी
मा.ना.श्री. मंगलप्रभात लोढा मंत्री, पर्यटन, कौशल्य विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते , मा.ना.श्री.दिपक केसरकर मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे विशेष व्ही सी द्वारे उपस्थितीत, आमदार मा श्री कपील पाटील विधानपरिषद सदस्य, मा.श्री. रनजीतसिंग देओल (भा.प्र.से.) प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, मा.श्री. सुरज मांढरे (भा.प्र.से.) आयुक्त शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, श्री कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य , मा.श्री. संदीप संगवे, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्या उपस्थितीत रंग शारदा सभागृह, के.सी. मार्ग, बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा (प.), मुंबई – 400 050 येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.