जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा येथे 5 वा राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा
आज दिनांक 16 सप्टेंबर 2022, शुक्रवार रोजी जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा येथे पाचव्या राष्ट्रीय पोषण माह 2022 चे आयोजन करण्यात आले . केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत माता पालक यांची शाळेच्या प्रमुख सौ. शिल्पा बळवंत वनमाळी यांनी सभा घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन केले .
सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून राबविण्यात येत आहे ,त्या अनुषंगाने पोषण व आरोग्य जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले होते .
सौ.वनमाळी मॅडम यांनी माता पालकांना सकस व चौरस आहार,पदार्थातील जीवनसत्वे, पोषणमूल्ये यांचे महत्त्व उदाहरणे देऊन व प्रत्यक्ष आहाराचे नमूने दाखवून समजावून दिले. ऋतुमानानुसार उपलब्ध होणाऱ्या स्थानिक धान्यातून, भाजीपाल्यातून पारंपारीक पाककृती कशी तयार करावी, त्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्याने होणारे फायदे सांगितले. पाण्याचे महत्त्व स्वच्छता आणि बचत कशी करावी , किशोरवयीन मुलींनी आणि मातांनी मासिकपाळी दरम्यान आपल्या आरोग्याची घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
परसबागेचे फायदे ,महत्त्व सांगून घराभोवतीच्या छोट्याशा जागेत आपण आपली छोटी परसबाग कशाप्रकारे फुलवू शकतो याबाबत मॅडमनी माहिती दिली .घर परिसर स्वच्छता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच गावाची स्वच्छता याबद्दल उद्बोधन करण्यात आले.
शाळेच्या पाड्यावरील गर्भवती महिलांनी कोणता आहार घ्यावा ,प्राणायाम कसे करावेत ,स्वच्छता कशी ठेवावी व स्वतः आनंदी कसे राहावे याविषयी सांगितले गेले.
आपला भारत देश कुपोषण मुक्त होण्यासाठी आणि ॲनिमियाची समस्या कमी करण्यासाठी असणारे संतुलित आणि सकस आहाराचे महत्त्व या चर्चासत्रातून माता पालकांपर्यंत पोहचविण्याचा सौ .वनमाळी मॅडम यांनी प्रयत्न केला.राष्ट्रीय पोषण माह उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे उपशिक्षक श्री. नागनाथ भोसले आणि श्री. पांडुरंग रावते यांनी आपले मोलाचे सहकार्य दिले.