"स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धा २०२२"
नमस्कार शिक्षकमित्रांनो,
भारत सरकारने स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालयांतर्गत’स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’साठी स्पर्धेची घोषणा केली आहे. शाळेतील पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि कोव्हीड-19 संदर्भातील कामे यांच्या आधारे ही स्पर्धा होणार असून त्यासाठी शहरी, ग्रामीण, शासकीय- निमशासकीय, अशासकीय, निवासी- अनिवासी कोणतीही शाळा सहभागी होऊ शकते. ही स्पर्धा म्हणजे आपण केलेले काम दाखविण्याची सुवर्ण संधीच आहे.
- महाराष्ट्राची आजची स्थिती :-
आपल्या राज्याने स्वच्छतेमध्ये नेहमीच विशेष काम केले आहे. अनेक शाळांनी गुणवत्तेबरोबरच याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक शाळा सहज पात्र ठरतात. मात्र असे असतानाही स्पर्धा जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटता तरी आपल्या राज्यातून अद्याप एक टक्का शाळांनीही सहभाग नोंदवला नाही. त्यामुळे देशपातळीवर सहभाग नोंदविण्याच्याबाबतीत आपल्या राज्याचा क्रमांक 30 वा आहे. हे निश्चीतच आपल्यासाठी भूषणावह नाही.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे अत्यंत सोपे आहे तसेच सर्व माहिती व फोटो सोबत घेवून बसल्यास केवळ 15 मिनिटांचे काम आहे.
आपणास आवाहन करण्यात येते की, आपल्या शाळेचा सहभाग नोंदवा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वचछ भारत, स्वच्छ विद्यालयामध्ये आपण कोठे आहोत हेही पडताळण्याची संधी आहे, त्यामुळे आपणास आवाहन आहे की आपण या स्पर्धेत सहभागी व्हावे
- स्पर्धेत सहभागी होण्याची पद्धत : -
- या स्पर्धेसाठी मोबाईल ॲप किंवा थेट वेबसाईटच्या माध्यमातून सहभागी होता येते. यासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका लिंकचा वापर करता येईल.
मोबाईल ॲपसाठी चित्रावर क्लिक करा.
वेबसाईटसाठी चित्रावर क्लिक करा.
या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची पद्धत अत्यंत सोपी असून केवळ यु-डायस कोडच्या आधारे नोंदणी करायची आहे.
- स्पर्धेसाठी नामांकन : -
वरील पद्धतीने नोंदणी केल्यानंतर एक फॉर्म येईल त्यातील सर्व प्रश्नांची वस्तुस्थितीनुसार माहिती भरावी, आवश्यक ठिकाणी फोटो अपलोड करावेत व फॉर्म सबमिट करावा. फॉर्म भरण्यापूर्वी तो पूर्णपणे वाचावा, शक्य झाल्यास प्रिंट घ्यावी व त्यात कच्ची माहिती भरावी व नंतरच ऑनलाईन जावून पक्की माहिती भरावी, जेणे करुन काही अडचण येणार नाही. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर काही बदल करता येणार नाही मात्र फोटो केव्हाही बदलता येवू शकतात. फॉर्म जोपर्यंत सबमिट केला जात नाही तोपर्यंत अनेकदा त्यात बदल करता येवू शकतात शिवाय एकाच वेळी सर्व फॉर्म भरणे शक्य झाले नसल्यास पुन्हा तो भरता येतो. ॲप किंवा वेबसाईटवर फॉम हिंदी किंवा इंग्लीशमध्ये आहे. आपल्या सोयीसाठी या फॉर्मची मराठी प्रत सोबतच्या लिंकमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ती अभ्यासून हिंदी किंवा इंग्लीश भाषेचा पर्याय निवडून फॉर्म भरावा.
- स्पर्धेत सहभागी होण्याचा कालावधी : -
31 मार्च 2022 ही शाळांनी नामांकन सादर करण्याची शेवटची तारीख आहे, मात्र शेवटच्या क्षणाला वेबसाईटवर भार वाढून अडथळे निर्माण होण्याचा अनुभव लक्षात घेता त्या आधीच नामांकन नोंदविणे फायद्याचे होईल. स्पर्धेचा अंतिम निकाल राष्ट्रीयस्तरावरुन 15 ऑक्टोबर 2022 रोजी जाहिर होईल.
- शाळा निवड प्रक्रीया: -
शाळेने भरलेल्या माहितीच्या आधारे शाळेतील पाणी,स्वच्छता व आरोग्य तसेच कोव्हीड-19 संबंधित कार्य कोणत्यास्तराचे आहे त्याआधारे शाळेला एक ते पाच स्टार पर्यंत गुण मिळतील. सर्व स्पर्धा ही 110 मार्क्सची असून ज्याशाळांना 90 टक्केच्यावर मार्क्स असतील त्यांना पाच स्टार तर ज्याशाळांना 35 टक्के पेक्षा कमी मार्क्स असतील त्यांना एक स्टार मिळतो. त्याआधारे जिल्हास्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरांवर शाळांची विविध टप्पयांत तपासणी होऊन शाळांची निवड होणार आहे. राष्ट्रीय पातळीवर 46 शाळा, राज्य पातळीवर 26 शाळा व जिल्हा पातळीवर 38 शाळांची निवड करण्यात येईल. स्पर्धेच्या पारितोषिकांत रोख रक्कम व प्रमाणपत्राचा समावेश आहे.