स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ तडफदार भाषण १ l Rajmata Jijau Speech in Marathi 1

Rajan garud
0

 स्वराज्यजननी  राजमाता जिजाऊ  तडफदार भाषण १

 Rajmata Jijau Speech in Marathi १


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व माननीय मंडळी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज या ठिकाणी मी आपल्या समोर स्वराज्यजननी  राजमाता जिजाऊंबद्दल दोन शब्द बोलण्याचे धाडस करत आहे.काही चूक झाल्यास ती पदरात घ्यावी.

खरे पाहता राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहिती नाही असा एकही मनुष्य शोधून सापडणार नाही. ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात उतरविले सुद्धा, त्या म्हणजे माँ साहेब जिजाऊ. पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले. माँसाहेबांचा उल्लेख करताना कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही.

राजमाता जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी १५९८ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते. लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध त्यांना चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले.

अनेक वर्षांपासून मुघल महाराष्ट्रावर चालून येत होते, येथील दीन जनतेला लुटत होते, आपल्या आया-बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते. कोण थांबवणार त्यांना ? कुणी काही म्हणू नये आणि कुणी काही सांगू नये अशी एकंदर परिस्थिती. परंतु यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही. मुळात कुणी अत्याचार करतांना दहा वेळा विचार करायला हवा असे काही तरी केले पाहिजे. हा विचार आपल्या उराशी माँ साहेबांनी केला.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले. माँ साहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपला पुत्र आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँ साहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँ साहेबांकडून मिळाले होते. आणि मातेने बघितलेले स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरविले


अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा तेव्हा नारीशक्तीने अवतार घेतला आहे. हे वाक्य राजमाता जिजाऊँसंदर्भात बोलले तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रातील मोठ-मोठ्या सरदारांना जे जमले नाही ते माँ साहेबांनी करून दाखविले. शिवबाच्या जन्माच्या अगोदरच माँ साहेबांनी त्यांचे ध्येय निश्चित केले होते. शिवबांनी सुद्धा मातेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रण घेतला. येण केण प्रकारेण स्वराज्य मिळवायचे हे राजांनी ठरविले.

“थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी ना फिटणार
चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे नाही मिटणार”

कुठल्याही मातेला पुत्रमोहापेक्षा काहीही प्रिय नसते. परंतु माँ साहेबांनी असा विचार कधीच केला नाही. स्वराज्य निर्माण करण्यात माँ जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. फक्त मुघलांपासून रक्षण करणे एवढेच नव्हे तर, न्यायनिवाड्याची कामे, नेतृत्व कौशल्य आणि एक मुस्तद्दी राजकारणी हे गुण सुद्धा त्यांनी शिवबांना दिले. आज आपण शिवबांना ‘जाणता राजा’ संबोधतो ते केवळ आणि केवळ माँ साहेबांनी राजांवर केलेल्या संस्कारांमुळे.

माँ साहेबांचे कार्य केवळ एवढेच नाही तर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य आणि नीतिमत्तेचे धडे माँ साहेबांकडून मिळाले. महाराजांनंतर स्वराज्याची जबाबदारी संभाजी राजेंनी अगदी चोख निभावली. यास कारणीभूत होत्या माँ साहेब आणि त्यांची शिकावण.


आज अशा माँ साहेबांची गरज प्रत्येक घरी आहे. आपण म्हणतो, “राजे पुन्हा जन्माला या”, परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेऊन मुलाला शिवबा बनविणारी माँ साहेब आधी घडवाव्या लागतील. माँ साहेब मनाने जेवढ्या हळव्या होत्या तितक्याच कणखरही होत्या. आजच्या युगातील मातांना कदाचित ते जमणार नाही.

“स्वराज्याचा जिने घडविला विधाता,
धन्य धन्य ती स्वराज्य जननी जिजाऊमाता”

माँ साहेबांबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे. समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद करून सुद्धा लिहिले तरी कमी पडेल, अशी माँ साहेबांची कीर्ती. महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवणाऱ्या अशा महान स्वराज्य जननी माँ साहेब राजमाता जिजाऊंना शतशः नमन करतो आणि माझे दोन शब्द संपवितो.

🚩जय जिजाऊ….🚩 जय शिवराय……🚩

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)