क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी २। SAVITRI BAI FULE JAYANTI BHASHAN MARATHI 2

Rajan garud
0

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी २। SAVITRI BAI FULE JAYANTI BHASHAN MARATHI 2



जिच्यामुळे शिकले दिन दुबळ्यांचे
मुली अन् मुले |
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती होती
सावित्रीबाई फुले |


सावित्रीबाई फुले भाषण मराठी सूर्या प्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे सुज्ञ परिक्षक आणि चांदण्यांप्रमाणे चमचमणारे सर्व रसिक श्रोतेहो! मित्रहो पहिल्यांदा, मी या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आणि अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या महोदयांचे मनापासून आभार मानते. कारण, आज त्यांच्यामुळे मला याठिकाणी भाषण करण्याची सुवर्णसंधी मिळतेय. तरी मित्रांनो, आजचा माझ्या भाषणाचा विषय आहे सावित्रीबाई फुले. भारतीय प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, भारतीय स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी सर्वप्रथम वंदन करते.


कारण, त्यांच्यामुळे मी याठिकाणी भाषण करण्यासाठी उभी आहे. कदाचित त्या नसत्या, तर मी आणि माझ्यासारख्या कित्येक मुली आजही चुल आणि मुल धरून बसल्या असत्या; हे सत्य आम्हां कुणालाही नाकारता येणार नाही. मित्रहो, अशा थोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म हा दिनांक ३ जानेवारी १८३१ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या एका छोट्याश्या गावी झाला.

 

सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. इसवी सन १८४० मध्ये वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले या थोर विचारवंतासोबत संपन्न  झाला. महात्मा ज्योतिबा फुले हे स्वत: एक महान विचारवंत, दानशूर व्यक्तिमत्त्व, विद्वान, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक देखील होते.


ज्यावेळी सावित्रीबाई फुले यांचे लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाले तेंव्हा सावित्रीबाई या शिक्षित नव्हत्या, तर त्या अशिक्षित होत्या. सावित्रीबाईंना लिहिता-वाचता काही येत नव्हतं, त्यांची अक्षरांशी काहीएक ओळख नव्हती. परंतू, लग्नानंतर ज्योतीबांनी सावित्रीबाई फुले यांना  लिहायला आणि वाचायला शिकवले. त्यांची अक्षरांशी ओळख करून दिली. सुरुवातीला, सावित्रीबाईंना शिक्षण ही संकल्पनाच खूप कठीण वाटत होती.

मात्र, महात्मा फुलेंनी त्यांना इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवायला सुरुवात केली की, हळूहळू सावित्रीबाई फुलेंना देखील शिकण्यामध्ये रस येऊ लागला. त्यांना ज्योतीबांची शिकवणं इतकी आवडली की त्या खूप कमी काळात अनेक नवनवीन गोष्टी शिकल्या. मित्रहो, काही काळानंतर याच माझ्या सावित्रीबाईंनी केवळ दलित समाजातीलच नव्हे, तर संपूर्ण भारत देशातील ‘पहिल्या महिला शिक्षिका’ म्हणून गौरव देखील प्राप्त केला.


खरंतर, सावित्रीबाई फुलेंच्या काळी तत्कालीन मुलींची अवस्था ही अत्यंत दयनीय आणि खूप बिकट होती. त्याकाळच्या मुलींना किंवा स्त्रियांना वाचन-लेखन करण्यासही परवानगी नव्हती. त्यामुळे, त्याकाळच्या कितीतरी मुली आणि स्त्रिया या शिक्षणापासून वंचित होत्या. त्यांचं आणि शिक्षणाचं खूप दूरवरचं नात होत. शिवाय, त्यांच्या मनात शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही केवळ समाजातील कर्मठ आणि कठोर हृदयी लोकांमुळे त्यांना शिक्षण घेता येत नव्हते. त्यामुळे, समाजातील ही अमानुष आणि घातक पद्धत मोडण्यासाठी तसेच, मुलींना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या थोर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन १८४८ मध्ये मुलींसाठीची पहिली शाळा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात स्थापन केली.


मित्रहो, आपल्या भारतात मुलींसाठी सुरु होणारी ही पहिली महिला शाळा होती आणि या शाळेमध्ये स्वत: सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी जात असत. पण मित्रांनो, शाळेत जाऊन मुलींना शिकवणे हे आपल्याला वाटते तितके अजिबात सोपे नव्हते.

मुलींना शिकवण्यासाठी तसेच, स्त्रियांना शिक्षण मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना लोकांच्या कडक विरोधाचा सामना करावा लागला. सावित्रीबाई फुलेंनी समाजातील केवळ मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांकडून होणारे स्वतःचे अपमान सहन केले नाहीत, तर त्यांना त्या मुलींच्या घरच्यांकडून सुद्धा अनेक शिव्या आणि बदनाम्या सहन कराव्या लागत होत्या.

समाजातील या कर्मठ लोकांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर फेकलेल्या दगडांचा फटका देखील माझ्या माईला निमुटपणे सहन करावा लागत होता.


मित्रहो, आपणा सर्वांच्या प्रिय असलेल्या सावित्रीबाई फुले या माऊली मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असताना; समाजातील धर्माचे कंत्राटदार आणि स्त्री-शिक्षणाचे कडक विरोधी हे आपल्या सावित्रीबाई फुलेंवर कचरा, गाळ आणि शेणच नव्हे, तर मानवी मलदेखील त्यांच्यावर टाकत असत.


खरंच, यावरून आपल्याला लक्षात येते की त्यावेळच्या माणसांची अशा प्रकारची  अमानुष वागणूक कोणत्या थरापर्यंत जाणारी होती. पण, समाजातील या विकृत विचारांच्या माणसांमुळे सावित्रीबाईंचे कपडे खूप घाण व्हायचे, म्हणून या माऊली अंगावर नेसलेली साडी सोडून आणखी एक ज्यादाची साडी आपल्याबरोबर शाळेत येताना आणायच्या. शाळेत आल्यावर शेणाने आणि मल्लाने घाण झालेली साडी बदलून आपल्या सोबत आणलेली साडी त्या परिधान करायच्या. पण मित्रांनो, इतके असूनही त्यांनी समाजासमोर कधीही हार मानली नाही आणि महिलांचे शिक्षण, सामाजिक कार्य तसेच, सामाजिक उत्थान यांचे कार्य त्यांनी अखंडपणे चालूच ठेवले.


शिवाय, महिलांच्या शिक्षणासह सावित्रीबाई फुलेंनी विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता, विधवा पुनर्विवाह देखील सुरू केला. जेणेकरून, विधवा असलेल्या स्त्रियांना त्यांचे आयुष्य नव्याने सुरू करण्याची संधी मिळेल आणि समाजासमोर त्यांचे विधवा असलेले रूपही नाहीसे होईल. खरंतर, याच उद्देशाने इसवी सन १८५४ मध्ये सावित्रीबाई फुलेंनी विधवा असलेल्या स्त्रियांसाठी आश्रम बांधले.त्याचबरोबर, सावित्रीबाई फुलेंच्या काळात स्त्रीभ्रूणहत्या देखील मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे, स्त्री-बालहत्या रोखण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी स्वतः नवजात मुलांसाठी एक आश्रम उघडला आणि त्या मुलांचे संगोपन तसेच पालनपोषण त्या स्वतःच करू लागल्या.


मित्रहो, आज आपल्या भारत देशातील स्त्री-भ्रूणहत्येचा वाढता कल पाहता, त्या काळात स्त्री-बालहत्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे आणि ते थांबवण्याचा प्रयत्न करणे किती कठीण काम होते, हे आपल्याला येथे समजून येते.


शिवाय, सावित्रीबाई फुलेंनी विधवांची अवस्था सुधारण्यासाठी खूप परिश्रम घेतले. मित्रांनो, त्याकाळच्या समाजात एक प्रचलित पद्धत अशी होती की, एखाद्या स्त्रीचा जर पती मयत झाला तर, त्या स्त्रीने स्वतःच्या पतीसोबत सती जावे. समाजाने तयार केलेल्या या जीवघेण्या पद्धतीच्या विरोधात माझ्या सावित्रीबाई फुले उभे राहिल्या आणि सती प्रथा रोखण्यासाठी तसेच, विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आपले अखंड प्रयत्न हे चालूच ठेवले.


मित्रांनो, एक गोष्ट मला याठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे, सावित्रीबाई फुले यांनी पतीसमवेत काशिबाई नावाच्या एका गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि फक्त त्यांनी त्या महिलेला आणि तिच्या पतीला आत्महत्येपासून परावृत्त केले नाही तर त्या दोघांनाही आपल्या घरीच ठेवले, विशेष करून त्या महिलेची आपल्या बहिणीप्रमाने काळजी घेतली आणि वेळेवर तिची प्रसुती देखील केली. प्रसूतीनंतर काशीबाई नावाच्या त्या महिलेला एक गोंडस मुलगा झाला. दिसायला इतका सुंदर आणि सर्वांना आकर्षित करणारा हा मुलगा, पुढे खूप हुशार आणि समजूतदार देखील बनला. सावित्रीबाईंनी त्या मुलाचे नाव ‘यशवंत’ असे ठेवले होते आणि त्यांनी काशीबाईचा मुलगा यशवंत याला दत्तक मुलगा म्हणून घेतले. त्यांनी त्या मुलाला खूप चांगले शिक्षण दिले जो की नंतर एक प्रसिद्ध डॉक्टरही बनला. यावरून, आपल्याला कळून येतं की सावित्रीबाई फुले यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात कधीही मागे वळून पाहिले नाही, त्या फक्त नित्यपणे आयुष्याच्या प्रवासात एक-एक पाऊल टाकत गेल्या आणि आपले सत्कर्म करत राहिल्या.


मित्रांनो, अशा प्रकारे सावित्रीबाई फुलेंनी आपल्या जीवनकाळात केवळ पुण्यातच अठरा  महिला शाळा उघडल्या. इसवी सन १८५४ साली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अनेक अनाथ आश्रम उघडले. खरंतर, एका व्यक्तीद्वारे भारतात सुरु होणारे हे पहिले अनाथ आश्रम होते.


मित्रहो, अशी अनेक समाजकार्य करत असताना, सावित्रीबाई फुलेंनी अवांछित गर्भधारणेमुळे होणाऱ्या  बालहत्या रोखण्यासाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ उभारले. सावित्रीबाई फुलेंच्या समाजोत्थान कार्यात काम करीत करीत ज्योतिबा फुले  यांनी देखील आपल्या अनुयायांसह २४ सप्टेंबर १८७३  रोजी ‘सत्यशोधक समाज’ अशा नावाची एक संस्था स्थापन केली.


सत्यशोधक समाज या संस्थेचे महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः अध्यक्ष होते आणि सावित्रीबाई फुले ह्या या संस्थेच्या महिला विभागाच्या प्रमुख होत्या. या संस्थेचे मुख्य उद्दीष्ट स्पष्ट होते, ते म्हणजे समाजातील शूद्र लोकांना आणि समाजात कमी मानल्या जाणाऱ्या कमी जातीच्या लोकांना उच्च जातीच्या लोकांच्या शोषणापासून मुक्त करणे.


मंडळी, महात्मा ज्योतीबांच्या या कार्यात सावित्रीबाई फुलेंनीही मोलाचे योगदान दिले होते. त्यांचाही या पवित्र कार्यात खूप मोठा वाटा होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर निम्न जाती, महिला आणि दलित यांच्या उद्धारासाठी काम केले.


महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या महान कार्यात त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान देखील अनन्य आहे. मित्रांनो, अशी अनेक कार्य करत असताना किंवा समाजामध्ये कोणतीही सुधारणा करण्याआधी कधी-कधी स्वत: महात्मा ज्योतीबा फुले सुद्धा आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांचे मार्गदर्शन घेत असत.


सावित्रीबाई फुले या आपल्या भारताच्या फक्त प्रथम महिला शिक्षीकाच नव्हत्या, तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिल्यांदा स्वतः विद्याग्रहण करून समाजातील महिलांची प्रगती करणाऱ्या एक विद्वान नारी देखील होत्या. या व्यतिरीक्त सावित्रीबाई फुलेंना आपल्या भारत देशात ‘महिलांच्या मुक्तिदाता’ असेदेखील म्हटले जाते. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरीता आणि त्यांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळवुन देण्याकरीता खर्ची घातले; हे सत्य आपणा कुणालाही नाकारता येणार नाही. अज्ञानी असलेल्या त्यांच्या काळातील समाजातील महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले होते, परंतु त्यांनी हा संघर्ष करत असताना कधीही हार मानली नाही.असे महान समाजकार्य करत असताना स्वतःचे धैर्य खचु न देता, स्वतःच्या मनात ठासून भरलेल्या पूर्ण आत्मविश्वासाने सावित्रीबाई फुले या कठोर संघर्षाला सामोरे गेल्या. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी इसवी सन १८४८ साली शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.


महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारखे पती त्यांना भेटल्यामुळे, त्यांच्या मदतीने सावित्रीबाई फुलेंना सतत पुढे जाण्याकरीता प्रेरणा मिळत होती. खरंतर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले हे सावित्रीबाई फुलेंचे केवळ पतीच नव्हते, तर ते त्यांचे एक चांगले गुरू, त्यांचा आधारस्तंभ आणि संरक्षक देखील होते.महात्मा ज्योतिबा फुलेंना सावित्रीबाई फुलेंचा खूप अभिमान वाटत असे. सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून, असेच कार्य सावित्रीबाईंनी नित्यपणे करावे यासाठी ते त्यांना प्रेरणा देत असत, शिवाय त्यांचा उत्साह देखील वाढवित असत.


मित्रहो, आपल्याला माहीत आहे की ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह सावित्रीबाईंसोबत झालं, त्यावेळेस सावित्रीबाई फुले या शिक्षीत नव्हत्या. पण, लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहावाचावयास शिकविले. तस पाहिलं, तर तो काळच स्त्रियांच्या दृष्टीकोनातुन फारसा चांगला काळ नव्हता.याकाळात स्त्रियांना शिक्षणाची देखील अनुमती नसल्याने सावित्रीबाईंच्या शिक्षणाकरीता महात्मा ज्योतिबांच्या परिवाराने सुद्धा सुरुवातीला फार विरोध केला. हळूहळू ज्योतिबांच्या परिवाराच्या स्त्रीशिक्षणाच्या विरोधाने इतके प्रखर रुप धारण केले की, जोतिबांच्या घरी यावरून वाद होऊ लागले.


ज्योतिबांच्या परिवारावर समाजातील चालिरीतींचा पगडा खूप होता तसेच, समाजातील अनेक कटु लोकांबद्दलची भीती त्यांच्या मनात ठासून भरली होती. खरंतर, याच भितीने ज्योतिबांच्या घरच्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनाही आपल्या घराबाहेर काढले.

परंतु, महात्मा ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले व त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला. समाजाच्या इतक्या भीषण विरोधानंतर देखील सावित्रीबाई फुलेंनी आपले शिक्षण पुर्ण केले. अशा रीतीने, सावित्रीबाई फुलेंनी आपले सगळे शिक्षण पुर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरीता आपण करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला.


पण, माझ्या या माऊलीचा हा विचार एखाद्या अवघड आव्हानापेक्षा कमी नव्हता हे खरं! कारण, एकतर त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती आणि त्यात सावित्रीबाई फुलेंनी समाजातील चालिरितींच्या विरोधात जाऊन आधीच स्वतःचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे, सावित्रीबाईंना त्यांचा हा विचार सत्यात उतरवण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला.त्यावेळच्या  समाजातील अमानुष रुढी, चालीरीती आणि परंपरा  तोडण्यासाठी सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतिबा फुले यांच्या साहाय्याने इसवी सन १८४८ साली मुलींची पहिली शाळा स्थापन केली.


मित्रांनो, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापित केलेली ही शाळा म्हणजे आपल्या भारत देशातील मुलींकरता सुरू होणारे पहिले महाविद्यालय ठरले. सुरुवातीला मुलींच्या या पहिल्या महाविद्यालयात एकूण नऊ मुलींनी प्रवेश घेतला होता. स्वतः सावित्रीबाई फुले ह्या या शाळेच्या मुख्याध्यापिका बनल्या होत्या आणि अश्या तऱ्हेने सावित्रीबाई फुले या आपल्या भारत देशाच्या पहिल्या महिला शिक्षीका देखील बनल्या. मला याठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी आपणा सर्वांना दिलेला एक उपदेश सांगावासा वाटतो, ती म्हणजे,


सावित्रीबाई म्हणायच्या: वेळ विनाकारण व्यर्थ घालवु नका! जा आणि शिक्षण प्राप्त करा!


शिक्षणाची महती माहीत असणाऱ्या सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा तर सुरू केली, पण पुढे या  शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. मित्रहो, अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती. पण, याच दरम्यान सावित्रीबाई फुलेंच्या समस्या देखील वाढत गेल्या.


सावित्रीबाई फुले ज्यावेळी मुलींना शिकविण्याकरीता आपल्या घरातून निघत असत, त्यावेळी घर ते महाविद्यालय हे अंतर पार करताना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे. सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, त्यांना शिवीगाळ केली जात असे, तरीदेखील त्या त्यांच्या निश्चयापासुन डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत.


सावित्रीबाईंनी आपल्या पूर्ण आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची प्रज्वल अशी ज्योत आपल्या मनात कायम तेवत ठेवली. सावित्रीबाई फुलेंनी पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने, इतर कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता दिनांक १ जानेवारी १८४८ पासुन ते १५ मार्च १८५२ पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरीता अठरा शाळा सुरू केल्या.शिवाय, इसवी सन १८४९ साली पुणे येथील उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी तेथे सुद्धा मुलींची शाळा सुरू केली. महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत असणाऱ्या सावित्रीबाई सतत या क्षेत्रात अहोरात्र काम करीत राहिल्या.

 मित्रांनो, सावित्रीबाई फुले या कवियत्री म्हणुन देखील या समाजाला परिचीत आहेत, “काव्यफुले” आणि “बावनकशी सुबोधरत्नाकर” यात त्यांच्या काव्यरचना आज देखील आपल्याला पाहता येतात. मित्रांनो, जुलै १८८७ मध्ये ज्योतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला. त्यांचे उजवे अंग लुळे पडले. त्यांच्या आजारपणात सावित्रीबाईंनी त्यांची अहोरात्र शुश्रुषा केली.परंतू, २८ नोव्हेंबर १८९० रोजी ज्योतिरावांचे त्या आजारात निधन झाले. त्याकाळी, अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरत असे त्याला वारसा हक्क मिळत असल्याने, वारसा हक्क मिळवण्यासाठी  ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावा यांना ते विरोध करू लागले.त्यावेळेस, सावित्रीबाई फुले धैर्याने पुढे आल्या आणि  स्वत: त्यांनी टिटवे धरले. सावित्रीबाई फुले इतक्या दुखः त असतानाही, त्या अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिली. जेंव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले तेंव्हा सावित्रीबाई फुलेंना आपल्या पतीच्या निधनाचा जोरदार धक्का बसला होता.


पण तरीसुद्धा ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर त्या सतत कार्यमग्न राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्या. मित्रहो, यशवंतराव हा एका विधवेचा मुलगा असल्याने, त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते.अशावेळी, कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी दिनांक ४ फेब्रुवारी १८८९ रोजी यशवंत रावांचा विवाह सावित्रीबाई फुलेंनी करून दिला. खरंतर, हाच आपल्या महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय. काही काळानंतर, इसवी सन १८९७ साली पुण्यात महाभयंकर अशी “प्लेगची” साथ सुरू झाली.


या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा केली आणि रुग्णांची सेवा करीत असतानाच सावित्रीबाई फुलेदेखील प्लेगच्या या आजाराने ग्रासल्या गेल्या. सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले होते, पण ते सर्व निष्फळ ठरले आणि शेवटी या महान माऊलीचे निधन दिनांक १० मार्च १८९७ रोजी झाले.


अशा रीतीने मित्रांनो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी संपूर्ण जगाचा कायमचा निरोप घेतला. मित्रहो, समाजाप्रती असलेल्या त्यांच्या अतुल्य अश्या  योगदानाला आपण सर्वांनी कधीही विसरता कामा नये. माझ्या या माउलीला महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कांरानी सन्मानित करण्यात आले होते.शिवाय, महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने त्यांच्या नावाने अनेक पुरस्कारांची निर्मीती सुद्धा केली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक डाक तिकीट देखील काढण्यात आले.


अशा या थोर क्रांतिज्योती, ज्ञानज्योती, ज्ञानदाति सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)