अफजलखानाचा वध- शिव प्रतापदीन
हिंदवी स्वराज्य
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून स्वराज्याचा विस्तार करत चाळीस महत्वाचे किल्ले जिंकण्यापर्यंत खुप धाडसी पराक्रम केले होते. त्यानंतर स्वराज्याच्या दृष्टीने शिवरायांनी अफजलखानाचा केलेला वध म्हणजे भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक अपूर्व घटना होती स्वराज्याच्या तेजस्वी दिव्य संकल्पनेचा एक महत्त्वपूर्ण निर्णायक टप्पा होता ज्यामुळे स्वराज्य संकल्पनेला बळ मिळालं अफजलखानासारख्या महापराक्रमी आणि धूर्त सरदाराला यमसदनी पाठवून शिवरायांनी त्यांच्यात असलेले अंगभूत नेतृत्वगुण, मुत्सद्देगिरी, धाडस, पराक्रम, धैर्य, ध्येयनिष्ठा, ईश्वरार्पणवृत्ती सिद्ध करून दाखविली होती. रयतेच्या मनात आता पूर्ण खात्री झाली कि शिवरायांच्या पाठिशी आई भवानीचा आशीर्वाद आहे आणि "हे राज्य व्हावे हि श्रींची" इच्छा आहे.
अफजलखान
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या हिंदवी स्वराज्याची धास्ती आदिलशाहीने घेतली होती आणि शिवरायांच्या पराक्रमाची धार विजापूरच्या मोठमोठ्या सरदारांनी अनुभवली होती. आदिलशाहीसमोरील शिवरायांचा हा मोठा धोका बड्या साहेबिणीला माहिती होता आणि म्हणून शिवरायांचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी तिने एका मातब्बर सरदाराची निवड केली त्याचे नाव होते, अब्दुल्लाखान म्हणजेच अफजलखान!! अफजलखान म्हणजे विजापूरच्या दरबारातील अत्यंत पराक्रमी, क्रुर आणि तेवढाच कपटी सरदार होता. अब्दुल्ला भटारी ते अफजलखान हा त्याचा शून्यातुन झालेला प्रवास होता. त्याने शहजादा औरंजेबाच्याही नाकी नऊ आणलेले होते, शाहजीराजांना कैद करून याच अफजलखानाने त्यांना विजापूरच्या दरबारात फरफटत आणले होते. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजांच्या मृत्युसही कारणीभूत हाच भोसलेकुळाचा हाडवैरी अफजलखान होता. अफजलखान वाईचा सुभेदार होता. शिवरायांनी वाईचा प्रांत जिंकून स्वराज्यात सामील केल्यामुळे अफजलखान आधीच चिडलेला होता आणि आता शिवरायांना "चढ्या घोड्यानिशी कैद करून आणतो" अशी शपथ त्याने भर दरबारात घेतली होती. अफजलखान हिंदुधर्माचा द्वेष्टा होता. विजापूरातील अफझलपुर भागात कोरलेल्या एका शिलालेखात तो स्वतःला "कातिले मुतमर्रिदान व काफिरान। शिकंद-ए-बुनियादे बुतान।" असे म्हणवतो. याचा अर्थ म्हणजे " काफिर आणि बंडखोरांची कत्तल करणारा आणि मुर्तीचा पाया उखडून टाकणारा आहे" असा होतो. याशिवाय दीन दार बुत् शिकन (म्हणजे धर्माचा सेवक आणि मुर्ती विध्वंसक) व ' दीन दार कुफ्रशिकन (धर्माचा सेवक आणि काफिरांचा कत्तल करणारा ) अशीही विशेषणे त्याने स्वत:ला लावली आहेत. अफजल खान अत्यंत गर्विष्टही होता त्याची एक फारसी मुद्रा सापडली आहे त्यावर
"गर अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफजल
अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफजल अफजल"
असे लिहिले आहे याचा अर्थ "जर श्रेष्ठ स्वर्गाला इच्छा झाली की उत्तम माणसांची उत्तमता व अफजलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवावी तर जपमाळेतील अल्ला अल्ला या ध्वनीच्या जागी अफजल हाच सर्वात उत्तम पुरूष आहे हे ध्वनी उमटू लागतील." असा स्वतःच स्वत:ची बढाई मारून गर्वाने फुगलेला अफजलखान शिवरायांना "जिंदा या मूर्दा" घेऊन जाण्यासाठी स्वराज्यावर चाल करून निघाला.
खानाचे डावपेच
स्वराज्यावर आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट होते. खान जसा बलदंड आणि पराक्रमी तसा कुटिल डाव खेळण्यातही निष्णात होता. त्याला शिवरायांच्या पराक्रमाची जाणीव होती आणि सह्याद्री पवर्तावरील जिंकण्यास अवघड आणि मजबूत किल्ले महाराजांचे बलस्थान आहे हे तो जाणून होता तसेच जावळीची किर्र शांतता आणि भयानकताही त्याला ठाऊक होती म्हणून अफजलखानाने त्याच्याजवळ २२००० सेना असतानाही थेट स्वराज्याच्या दुर्गम भागात युद्ध करायचे टाळले . अफजलखानाने सर्वप्रथम वाटेत येणाऱ्या सर्व देशमुख- वतनदारांना त्याच्या या मोहीमेत फौजेनिशी सामील होण्याचे फर्मान पाठविले. त्याची भीती वाटून तसेच स्वार्थापोटी खंडोजी खोपडेसारखे वतनदार खानाच्या गोटात सामील झाले. कान्होजी जेधेंसारखे निष्ठावान मावळे मात्र स्वतःच्या वतनावर पाणी सोडून स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले.
शिवरायांवर थेट हल्ला न करता त्यांना मोकळ्या मैदानात खेचून आणण्यासाठी अफजलखानाची धर्मांध वृत्ती बाहेर पडली. खानाला शिवरायांच्या ईश्वरभक्तीबद्दल तसेच धर्माभिमानाबद्दल माहिती होती आणि म्हणूनच हिंदूंच्या श्रध्दास्थानांवर आघात करण्याचे त्याने ठरवले. असे केल्याने शिवाजी चवताळून युद्धासाठी तयार होईल आणि मोकळ्या मैदानात लढायला येईल तेव्हा त्याला सहज कैद करता येईल असा खानाचा कुटील डाव होता. सर्वप्रथम तुळजापूरला येऊन तेथे खानाने हैदोस घातला आई तुळजाभवानीची मुर्ती फोडून तिला जात्यात भरडून काढली(मुळ मुर्ती पुजाऱ्यांनी लपवून ठेवली होती आणि बहुदा हि दुसरी मुर्ती होती. मंदिरात गाय कापून इतर मंदिरही त्याने तोडले, या घटनेबद्दल शाहिर अज्ञानदास लिहितो
"मजलीवर मजल । अबदुल तुळजापुरा आला ॥
फोडिली तुळजा । वरती मसुदच बांधिली॥
मसुद बांधुनी । पुढे गाय जब केली॥
अबदुलखान फोड़ी देवीला। काही एक अजमत दाव मला ।।"
पंढरपूरसह अनेक ठिकाणी हिंदु मंदिरांवर खानाने घणाघात केले. या सर्व वार्ता शिवरायांना कळत होत्या मात्र हि प्रतिशोधाची योग्य वेळ नाही म्हणून शिवराय योग्य वेळेसाठी तयारी करत होते अफजलखानाने यापुढे जाऊन अजून एक नीचपणा केला त्याने शिवरायांचे मेहूणे बजाजीराजे निंबाळकर यांना कैद करून त्यांना हत्तीच्या पायी देण्याचे घोषित केले वास्तविक बजाजीराजे विजापूरचेच सरदार होते मात्र निव्वळ ते शिवरायांचे नातेवाईक आहेत या द्वेषापायी आणि शिवाजी हे बघून शरण येईल या अपेक्षेने अफजलखान हा क्रूर डाव खेळत होता मात्र यातूनही शिवरायांनी स्वत:च्या बुद्धिचातुर्याचा परिचय देत बजाजींची सुटका करून घेतली
शिवरायांना थेट रणक्षेत्रावर आणण्यासाठी खानाने अनेक युक्त्या लढवल्या मात्र यात त्याला यश मिळाले नाही म्हणून त्याने राजांना कपटनितीने भेटावयास बोलवून खोटा तह करून तेथेच महाराजांचा नि:पात करण्याचे ठरवले. खानाने आपला वकील कृष्णाजी भास्करला शिवरायांकडे पाठवून त्याच्यामार्फत कधी गोड, प्रेमळ तर कधी धमकीवजा शब्दांचा आपला संदेश शिवरायांपर्यंत पोहोचवला आणि शिवरायांना वाईस तहासाठी त्याच्या छावणीत येण्याचे सांगितले.अफजलखानाला शिवराय चांगलेच ओळखून होते. आणि म्हणून त्यांनीही डाव खेळला "मी चुकलो आहे, खानसाहेब आम्हाला आबासाहेबांच्या ठायी आहेत" असे बोलून भेटायचे टाळले. शिवरायांकडे आता दोनच मार्ग उपलब्ध होते आणि ते म्हणजे खानाला भेटून तह करणे अथवा या किल्ल्याहून त्या किल्ल्यावर जाऊन खानाला झुंजवत ठेवणे राजांनी त्यांच्या सहकार्यांशी यावर चर्चा केली सर्वांचे म्हणणे तह करण्याचे होते मात्र महाराजांना अफजलखानाचा कपटी स्वभाव माहिती होता आणि त्याला भेटणे म्हणजे साक्षात मृत्यूशी गाठ हेही ते जाणून होते. खानाचा नेमका हेतू कळावा म्हणून शिवरायांनी पंताजी गोपीनाथ बोकिल यांना वकिल म्हणून खानाकडे पाठवले. पंताजीकाकांनी त्यांच्या विलक्षण चातुर्याने अफजल खानाला शिवरायांचा संदेश सांगितला आणि राजे खुप घाबरले आहेत ,असेही सांगितले. हे ऐकून मूळ गर्विष्ट अफजलखान गर्वाने अजूनच फुगला. पंताजींनी खानाच्या सैन्यात फिरून खानाच्या गोटात नेमक काय शिजतयं, हे शोधून काढले. शिवरायांना भेटून कुटनीतीने ठार करावे हे खानाच्या मनात आहे हे पंताजींनी हेरले शिवरायांचे हेर खातेही खुप महत्वाची भूमिका बजावत होते. शिवरायांना खानाचा हा बेत समजल्यावर पंताजींना खानाला जावळीस भेटावयास आणण्याची जबाबदारी दिली.पंताजी गोपीनाथांनी चोखपणे ती जबाबदारी पार पाडली, अफजलखान शिवरायांना भेटण्यासाठी जावळीस येण्यास तयार झाला.खानाच्या काही चतुर मुत्सद्यांनी त्याला जावळीस न जाण्याचा सल्ला दिला, मात्र घमंडी अफजलखानाने त्यांनाच शिक्षा दिली आणि शिवरायांना ठार मारण्यासाठी उतावळा झालेला अफजलखान अनेक अडचणी पार करत वाईहून प्रतापगडाच्या पायथ्याशी दाखल झाला.
अफजलखानाचा वध
रयत आणि हिंदुधर्मावर होणारे खानाचे अत्याचार बघून शिवराय व्यथित झाले होते. व्यक्तीगत जीवनातही त्यांना दु:खाचे आघात सोसावे लागत होते. शिवरायांच्या प्रिय पत्नी आणि बाळ शंभूराजेंच्या आई सईबाईसाहेब आजारी होत्या, त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राजगडावरील नवरात्रीचा सण सुतकात गेला. या दु:खद घटना घडत असतांना अफजलखानाच्या रुपाने मोठे संकट आले होते.पण अशा संकटातही शिवराय स्थितप्रज्ञ होते, हे सामान्य माणसाला केवळ अशक्यच!! आऊसाहेब जिजाऊसुद्धा आपल्या एकुलत्या एक पुत्राला धीर देत होत्या. सर्व सरदार आणि रयत चिंतेने भयभीत झाली होती त्यावेळी ही स्वराज्याची जननी सर्वांचे मनोबल वाढवित होती. शिवराय आणि अफजलखान भेट ठरल्यावर आऊसाहेब शिवबांना म्हणाल्या "राजे संभाजींचे उसने घ्या"
शिवरायांनी आपल्या सैन्यास प्रतापगडावर युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले. परंतू सर्व कारभारी, सरदार आणि मावळे आत्मविश्वास गमावून बसले होते, त्यांना शिवरायांच्या प्राणाची काळजी वाटत होती. ही काळजी जाणे गरजेचे होते त्याशिवाय या मोहिमेत यश संपादन करणे कठिण होते, शिवरायांनी विवेकबुद्धिने एके दिवशी सर्वांना बोलावणे धाडले, लगेच सर्वजण गोळा झाले. त्यावेळी महाराज त्यांना म्हणाले "रात्री आई तुळजाभवानीने आम्हास दर्शन दिले आणि बोलली की, आपण प्रसन्न जाहलो. सर्वस्वी सहाय्य तुजला आहे तुझ्या हस्ते अफजलखान मारविते तुजला यश देते. काही चिंता करू नकोस" हे सांगून शिवराय पुढे म्हणाले "श्री प्रसन्न जाहली, आता अफजलखान मारून गर्दीस मिळवतो" हे ऐकून जे मुत्सद्दी घाबरले होते त्यांची भीती दूर झाली. साक्षात आई तुळजाभवानी राजांसोबत असल्यावर आता भीती कशाची? असा आत्मविश्वास सर्वांमध्ये निर्माण होऊन नवीन उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर उमटू लागला. शिवाजी महाराजांनी "हे राज्य व्हावे, हि श्रीं ची इच्छा" याचे स्मरणच सर्वांना करून दिले. यावरून सर्वांच्या मनाचा ठाव घेत त्यांचा उपयोग स्वराज्यासाठी कसा करायचा,हे शिवराय उत्तम प्रकारे जाणत होते. कुठल्याही संकटाचा अग्रभागी राहून सामना करण्याचे धाडस शिवरायांमधे होते.
हिंदवी स्वराज्याच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाची आणि जीवनमरणाचा प्रश्न बनून राहलेली अफजलखान आणि शिवाजी महाराजांची ही भेट मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ( दि १० नोव्हेंबर १६५९) गुरूवार रोजी ठरली. प्रतापगडाच्या पायथ्याशी "अखंड सावधान " असलेले अष्टावधानी शिवराय संपूर्ण तयारीनिशी अफजलखानाला भेटायला गेले आणि तिथेच त्या दैत्याचा कोथळा त्यांनी बाहेर काढला. शिवरायांनी या बत्तीस दाताच्या बोकडाचे मस्तक देवीच्या पायावर चढविले. स्वराज्यावरील हे मोठे संकट आई भवानीच्या कृपेने दूर झाले. सर्व हिंदुस्थानचे लक्ष या भेटीकडे लागले होते. तिकडे औरंगजेबही अफजलखानाच्या हातून शिवाजी ठार होईल या स्वप्नात दंग झाला होता. पण अफजलखानास मारुन "अगली बारी तुम्हारी" असा संदेशच शिवरायांनी औरंगजेबाला दिला होता. शिवरायांचे हिंदवी स्वराज्य भविष्यात मोगलांसाठी आव्हान आहे,याची जाणीव औरंगजेबाला झाली होती.
शिवरायांच्या पराक्रमाने पन्हाळ्यापर्यंतचा आदिलशाही मुलुख स्वराज्यात सामील झाला. सरनौबत नेतोजी पालकरांनी तर थेट विजापूरवर हल्ला चढविला. आजपर्यंत शतकानुशतके या सुलतानांचे आघात सहन केले जात होते मात्र प्रतिघात करण्याचे सामर्थ्य शिवरायांनी हिंदु समाजात निर्माण केले होते. रयतेचे कल्याण, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा निर्दाळण होत होते. आई तुळजाभवानीचा आशिर्वाद आणि जिजामातेच्या संस्कारातून शिवरायांसारखा रक्षणकर्ता घडला होता."शिवराय हे देव,देश,धर्माच्या रक्षणासाठी अवतीर्ण झालेले महापुरुष आहेत" म्हणून लोक त्यांना साक्षात शंकराचे अवतार मानू लागले होते.
शिवरायांचा एक एक मावळा स्वराज्यासाठी प्राण वैरायलाही तयार होता अफजलखानाचा वध करुन शिवरायांनी रयतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. रयतेला शिवरायांमुळे धर्माचे, लेकी -सूना आणि आया-बहिणींच्या अब्रूचे रक्षण होईल हा विश्वास वाटत होता,त्यामुळे सर्व साधुसंतही शिवरायांना विजयी होण्याचा आशीर्वाद देत होते.
अफजलखानासारखे महासंकट आपल्या अतुलनीय शौर्याने महाराजांनी संपवले होते.अफजलखानाचा वध हा स्वराज्यहिताच्या दृष्टिने एक महत्वाचा निर्णायक टप्पाच होता!!
जिहाद असाच संपवावा लागतो,आणि आम्ही तो नक्कीच संपवू शकतो हा विश्वास हिंदु समाजात निर्माण करण्याची गरज आहे,त्यासाठी पुन्हा पुन्हा शिवचरित्राचे स्मरण आणि आचरण करण्याची आवश्यकता आहे.