शेतात घराजवळ कंपोस्ट खताचा खड्डा असून त्यामध्ये म्हशीचे शेण व गोठ्यातील, घरातील ओला व सुका कचरा टाकला जातो. त्या खड्ड्यातील कंपोस्ट खत शेतात टाकत असताना त्यातून गरम हवा बाहेर येत होती. वर्गशिक्षिकांकडे त्याबद्दल विचारणा केली आणि पाचवीतील चिमुकल्यांनी चोवीस तास गरम पाण्याचा प्रकल्प साकारला.
कंपोस्ट खताच्या खड्ड्यातील उष्णतेचा उपयोग करुन घरात गरम पाणी आणता येईल, अशी कल्पना हर्षवर्धन विनायक इंगळे व सुमीत समाधान शिंदे यांना सूचली. त्यांनी गोठ्याजवळील शेणाच्या उकिरड्यात ठिबक सिंचनासाठी वापरला जाणारा काळा पाईप टाकला. पाईपमधून गरम हवा बाहेर येत होती. त्यानंतर एका बाजूने पाणी सोडले, तेव्हा दुसऱ्या बाजूला गरम पाणी येऊ लागले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दोन इंची व्यासाचा काळा पाईप वापरुन तसा प्रयोग केला. कचरा विघटनामुळे त्यातून ४२ ते ६० सेल्सिअंश उष्णता बाहेर पडते आणि त्याचा वापर करूनच पाणी गरम करण्याचा हा प्रयोग आहे. चार सदस्यांच्या कुटुंबाला पुरेल एवढे ६० ते ७० लीटर थंड पाणी (साधारण ४० ते ४८ से. तापमानावर) काही तासांनंतर गरम झाले. हा प्रयोग वर्गशिक्षक पैगंबर तांबोळी, वैज्ञानिक अरुण देशपांडे आणि प्रिसिजन फाउंडेशन व सर फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार उपक्रमापर्यंत पोहोचला. त्या चिमुकल्यांचे सर्वांनीच कौतुक केले. चिमुकल्यांच्या कल्पनाशक्तील वाव देण्यासाठी प्रिसिजन कंपनीचे यतीन शहा, डॉ. सुहासिनी शहा, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, आविष्काराचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, तिपन्ना कमळे, बाबासाहेब शिंदे, अनघा जहागीरदार, राजकिरण चव्हाण, नवनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.