बादशहा झक मारत आहे - Badshah Jhak Marat Aahe
एके दिवशी अकबर आणि बिरबल फिरत होते व फिरता फिरता नदी काठी पोचले. नदी काठी काही मच्छीमार हे मासे मारत होते. त्यांना मासे मारतांना बघून अकबरला पण मासे मारण्याचा मोह झाला. व त्यानेही मासे मारण्यास सुरूवात केली. काही कारणा निमित्त बिरबलला राणीकडे निरोप घेऊन जावे लागले. तेथे पोहचल्यावर राणीने राजी खुशी व्यतीरिक्त विचारले की, बादशहा कुठे आहेत?
बिरबलने तात्काळ उत्तर दिले, ‘झक मारत आहेत.’
राणी या उत्तराने खूप नाराज झाली व जेव्हा बादशहा अकबर महालात आले तेव्हा बिरबलने केलेल्या कृत्याची गोष्ट कथन केली आणि बिरबलला शिक्षा देण्याची विनंती केली. आपल्या प्रती बिरबलचे असे अपशब्द ऐकून बादशहा क्रोधीत व रागाने लाल झाला. यावर राणीने महाराजांना टोमणा मारला, बिरबलला खूप डोक्यावर चढवले आहे याचे फळ हेच असणार आहे.
राणीच्या या बोलण्याने बादशहा आणखी चिडला. बादशहाने त्याचवेळी शिपायांना आज्ञा दिली की बिरबलला ताबडतोब बोलवून आणा. आज्ञा मिळताच शिपाई बिरबलला घेऊन आले. बिरबल येताच अकबर बादशाह क्रोधीत होऊन बोलला, ‘आज तू राणीला काय सांगितले? तुझे डोके जास्तच चालते आहे.’
बिरबलने नम्रपणे सांगितले मी तर फक्त हे सांगितले होते की, ‘बादशहा झक मारत आहे. याचे कारण असे आहे की आपल्या संस्कृत भाषेत माश्याला झक म्हणतात. यामुळे मी असे बोललो. जर माझ्याकडून काही अपराध घडला असेल तर मला क्षमा करावी.’
बिरबलचे उत्तर ऐकून अकबर बादशहाचा राग शांत झाला व राणीही आनंदी झाली.