सुसज्ज रुग्णालयासाठी सफाळे परिसर संघर्ष समितीचा एल्गार; ३० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला जोर

Rajan garud
0

सुसज्ज रुग्णालयासाठी सफाळे परिसर संघर्ष समितीचा एल्गार; ३० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला जोर






जतिन कदम : सफाळे बातमीदार


सफाळे परिसर संघर्ष समितीच्या वतीने सफाळे गावात नवीन रुग्णालयाच्या मागणीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र ते रेल्वे स्टेशन पर्यंत मानवी साखळी आंदोलन आज रविवार (दि.26) रोजी करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत काळे, उपाध्यक्ष मंगेश घरत, सचिव सुनील निमकर, अनंत कुडू, पोखराज लोढा, डालचंद नागदा, पंचायत समिती माजी सदस्य सुभाष म्हात्रे, कमळाकर पाटील व संघर्ष समितीचे सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सफाळे पोलिस स्टेशनकडून मात्र निवडणूक आचारसंहितेचे कारण दाखवत आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आल्याने हे आंदोलन आटोपते घेण्यात आले. असे असले तरी एक लाख लोकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार असे संघर्ष समितीकडून सांगण्यात आले. या आंदोलनाला व्यापारी मंडळ, सुन्नी संघटना, सर्व पक्षांनी व नागरिकांनी रस्त्यावर उतरून पाठींबा दिला.



             सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न करण्यात येत असले तरी त्याला अद्याप यश प्राप्त न झाल्याने सफाळे परिसर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली व त्या अनुषंगाने सफाळे आणि परिसरातील ५० गावांसाठी सुसज्ज रुग्णालय असावे, या मागणीला जोर धरण्यात आला. परिसरातील अनेक नागरिक सुसज्ज रुग्णालयाच्या अभावी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्याने, संघर्ष समितीने गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील सहा आमदार व खासदारांना पत्रव्यवहार करून निवेदने दिली आहेत. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्यमंत्री यांच्याकडे देखील पाठपुरावा केला असला तरी अद्याप आश्‍वासनांशिवाय कोणतेही यश मिळालेले नाही. त्यामुळे शेवटी, सफाळे परिसर संघर्ष समितीने सर्वपक्षीय मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन करून रुग्णालयासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ, असे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष मंगेश घरत यांनी सांगितले. संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत काळे यांनी म्हटले की, या मानवी साखळी आंदोलनाच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींनी किमान हा मुद्दा महत्त्वाचां समजून सफाळे येथे ३० खाटांचे सुसज्ज रुग्णालयात बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा. पालघर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णालयाचे काम सुरू झाले असताना सफाळे येथे देखील सुसज्ज रुग्णालय या वर्षभरात बांधले गेले तर अनेक जणांचे प्राण वाचतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)