अक्षरधारा फाऊंडेशनतर्फे डहाणूत आदिवासी मुलींना मोफत सायकल वाटप
जतिन कदम : सफाळे बातमीदार
डहाणू तालुक्यातील जि. प. शाळा गोवणे, केंद्र- चंद्रनगर, येथे अक्षरधारा फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आज (दि.18) रोजी मोफत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गोवणे शाळेतील एकूण 18 विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ देण्यात आला. गोवणे व साखरे परिसरातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी लांब अंतरावरून, दूर पाड्यांवरून शाळेत अध्ययनासाठी येत असतात. सद्यस्थितीला कोरोना महामारीमुळे इयत्ता आठवीचा वर्ग नियमितपणे सुरू झालेला असून काही विद्यार्थिनी शाळेत सतत अनुपस्थित असल्याचे वर्गशिक्षिका प्रतिभा क्षीरसागर-कदम यांच्या लक्षात आले. तसेच दूर पाड्यावरून येणाऱ्या विद्यार्थिनींना अंतर जास्त असल्याने शाळेत येण्यात अडचणी येत असल्याची बाब माहे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या पालक सभेत पालक प्रतिनिधी चैनेश कोकेरा यांनी मांडली असता आठवीच्या वर्गशिक्षिका प्रतिभा क्षीरसागर-कदम यांनी ही समस्या अक्षरधारा फाउंडेशन, मुंबई यांच्याकडे संपर्क साधून मांडली. ही समस्या लक्षात घेऊन त्यांनी लांब अंतरावरून येणाऱ्या संबंधित सर्व विद्यार्थिनींना लाभ देण्याचे आश्वासन दिले व त्यानुसार आज शनिवारी सर्व विद्यार्थिनींच्या पालकांच्या समक्ष सदर सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी गोवणे गावचे सरपंच दशरथ गहला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात अक्षरधारा फाउंडेशन, मुंबईचे संचालक राकेशभाई शाह, अतुलभाई व्होरा, पुरब गुप्ता, रितेश शेठ इत्यादी मान्यवरांसह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बारक्या वायेडा, ग्रामपंचायत सदस्य सचिन कोम, माजी उपसरपंच विलास सुमडा, पळे केंद्राच्या केंद्रप्रमुख अस्मिता पाटील, शिक्षक दीपक साळवी, विजय पावबाके इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा क्षीरसागर-कदम यांनी केले तर दीपक साळवी यांनी आभार मानले.
यावेळी विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रमिला भोईर, पालक प्रतिनिधी अरविंद गडग इत्यादींनी आपली मते मांडली.