लायन्स क्लब ऑफ सफाळे तर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार व कोविड योद्धा पुरस्कार 2021 वितरण

Rajan garud
0

 लायन्स क्लब ऑफ सफाळे तर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार व कोविड योद्धा पुरस्कार 2021 वितरण



      दुर्गम भागात असलेल्या असंख्य अडचणींवर मात करून कोरोनाच्या महाआपत्तीमध्ये सुद्धा पालघर जिल्ह्यातील शिक्षक अत्यंत गौरवास्पद काम करत असून अशा उपक्रमशील शिक्षकांमुळे जिल्ह्याचा नावलौकिक होत आहे असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी केले. 

    लायन्स क्लब ऑफ सफाळे तर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने व आदर्श शिक्षिका स्व. प्रणिता प्रवीण पाटील स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021 व  कोविड योद्धा पुरस्कार 2021 वितरण समारंभ सफाळे येथील देवभूमी सभागृहात मंगळवारी ( दि. 7 ) संध्याकाळी उत्साहाने पार पडला . या वेळी विशेष अतिथी म्हणून बोलतांना शिक्षणाधिकारी भागवत यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करतांना शाल ही मायेची प्रतीक तर आहेच परंतु त्याहीपेक्षा ती जबाबदारीचे प्रतीक आहे असे सांगून पालघर जिल्ह्यातील अधिकाधिक शिक्षकांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. तसेच लायन्स क्लब च्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

     पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी डिस्ट्रिक गव्हर्नर डॉ. ख्वाजा मुदस्सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आई मुलाला जन्म देते, तर शिक्षक त्याला जीवन देतात. समाजातील शिक्षकांची भूमिका ही नेहमीच प्रेरणादायी आणि दिशादर्शक राहिली आहे. कोरोनाच्या महाआपत्तीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता जनसामान्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस, नर्सेस, आशा सेविकांचा सुद्धा  सन्मान केल्याने निश्चितच त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा प्राप्त होईल असे सांगितले.

        प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी विद्यार्थ्यांना घडवतांना देशाचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक असून जर आपण आपली जबाबदारी आणि कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडले तर त्याची योग्य ती दखल समाज घेत असतो. कोणत्याही आपत्तीमध्ये माणसाचा चांगुलपणाच त्याला जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरतो असे सांगितले.

        या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ सफाळे चे अध्यक्ष नितीन वर्तक होते. क्लबचे सचिव तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक  प्रमोद पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांपैकी स्वेजल म्हात्रे, दर्शन भंडारे आणि महेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

   यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन मनोज बाबूर, सफाळे क्लबचे माजी अध्यक्ष लायन प्रवीण पाटील, खजिनदार मनोज म्हात्रे, उपाध्यक्ष विकास वर्तक, सफाळे लायन्स क्लबचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्य आणि विविध क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते. 



      यावेळी आदर्श शिक्षिका स्वर्गीय प्रणिता प्रवीण पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पालघर तालुक्यातील सहा प्राथमिक आणि सहा माध्यमिक अशा बारा शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021 देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोनाच्या  महा आपत्तीमध्ये अविरतपणे जनसामान्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस, परिचारिका, आशा परिचारिका अशा एकूण 17 जणांना कोविड योद्धा पुरस्कार 2021 देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारार्थीना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुस्तक गुलाबाचे रोपटे, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतीन कदम यांनी केले. तर आभार प्रदर्शन क्लबचे उपाध्यक्ष विकास वर्तक यांनी केले.

  शासनाने 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा सप्ताह थॅंक अ टीचर या अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह म्हणून साजरा केला. या सप्ताहाची पालघर तालुक्यात लायन्स क्लब ऑफ सफाळे तर्फे शानदार सांगता करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)